आपण नेहमीच ऐकतो पैशाने सुख विकत घेता येत नाही, अगदी खरं आहे. पण हेही तितकाच खरं की ‘रोटी कपडा मकान आणि Wifi’ साठी पैसाच लागतो.
पण नुसते पैसे कमवण्याच्या मागे न घावात, प्रत्येकानी आर्थिकरित्या आत्मनिर्भर बनण्यावर जोर दिला पाहिजे.
तर आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत – आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे तुम्हाला हवी असलेली जीवनशैली जगण्यासाठी लागणारा पैसा स्वतःच्या बळावर मिळवणे.
इथे प्रश्न फक्त तुम्ही किती पैसे कमवता हा नसून, तुम्ही किती खर्च करता आणि किती साठवले आहेत हा आहे.
आत्मनिर्भरतेचे निकष पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जातात.
तारुण्यात पदार्पण करताना
जेव्हा तुम्ही पालकांच्या पंखांखालून बाहेर येऊन स्वबळावर उडायला आतुर असता, त्या वयात आत्मनिर्भरता हि पैश्या वर नाही तर तुमच्या विचारसरणीनवर अवलंबून असते.
या वयात पैसे झाडावर उगवत नाहीत याची जाणीव असायलाच हवी. घरच्यांच्या पैश्यावर ऐष करण्या ऐवजी, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायची तयारी करायला हवी. उदाहणार्थ, घरी कितीही कार उभ्या असल्या तरी वेळप्रसंगी बस नि प्रवास करता यायला हवा.
त्याच्याही वर, त्या ‘Must have Sneakers’ किंवा ‘Latest Game Console’ घेण्यासाठी सुट्टीत एखादा पार्ट तिने जॉब केला तर अतिउत्तम. स्वतः कष्ट केल्यावर आपल्याला पैश्याची किंमत कळते.
आणि या आत्मनिर्भरतेचे फळ काय? -निवड करण्याचं स्वातंत्र्य.
जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर असता, आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगायची तयारी असते तेव्हा, इतरांच्या दबावाला बळी न पडता, तुमचं आयुष्य कसं असावं, कोणतं करिअर निवडायचं, कुठे राहायचं – हे सगळे निर्णय तुम्ही मोकळेपणाने घेऊ शकता.
कमवायला लागल्यावर
जेव्हा तुम्ही कमवायला लागत तेव्हा आर्थिक आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःचे सर्व खर्च स्वतः भागवणे आणि काही पैसे वाचवून त्यांची गुंवणूक सुरु करणे.
आणि स्वतःचे खर्च म्हणजे फक्त कॅब, हॉटेलिंग आणि खरेदी नाही. माणसाला स्वातंत्र्य पणे जगायला जो काही खर्च येतो – घरभाडे, किराणा, कामाच्या बायका, गॅस, वीज, प्लंबर, सगळं काही. आणि हे सगळं करून थोडी थोडी बचत आणि गुंतवणूक पण.
या टप्प्यावर खर्चावर नियंत्रण ठेवून भविष्यासाठी तजवीज करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही घरचा पण थोडा आर्धिक भार उचलत असाल, तर अतिउत्तम.
आणि या आत्मनिर्भरतेचे फळ काय? -निवड करण्याचं स्वातंत्र्य.
तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असाल, तर कोणीही तुम्हाला सहजपणे दडपू शकत नाही. हे सर्वांसाठी महत्त्वाचं असलं तरी, स्त्रियांसाठी हे विशेषतः आवश्यक आहे. आत्मनिर्भरते शिवाय स्त्रिया अनेकदा सामाजिक जोखडांमध्ये अडकून पडतात.
आत्मनिर्भरता स्त्रियांना स्वतःच्या भल्या साठी ठाम पणे उभे राहण्याचे आणि वेळप्रसंगी क्लेशदायक नाती झुगारून देण्याचे बळ देते.
खोडे स्थिरावल्यावर
जेव्हा तुम्ही तुमच्या कामात स्थिरावले असता, उत्पन्न बऱ्यापैकी वाढलेले असते, तेव्हा आत्मनिर्भरतेची वाख्या अजून व्यापक होते.
रोजचे खर्च भागवण्या बरोबरच तुम्ही कुठल्याही संकटकालासाठी तयार आहेत का? अचानक नोकरी गेली किंवा मोठे खर्च समोर आले तर तुम्ही कर्ज न घेता, साठवलेल्या पैश्यातून ती कठीण वेळ निभावू शकता का?
त्या साठी परत खर्चा वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जसे उत्पन्न वाढते तसे आपले Lifestyle Expenses वाढत जातात. अश्यावेळी कटाक्षाने वाढलेल्या उत्पन्नाचा जास्तीतजास्त भाग पहिले गुंतवणूक करावा मग ऐच्छिक खर्च करावेत.
या टप्प्यावर, किमान एका वर्षाचा खर्च भागेल इतकी गुंतवणूक गाठीशी असायला हवी, जेवढी जास्त तेवढे अधिक चांगले.
आणि या आत्मनिर्भरतेचे फळ काय? – चिंतेपासून स्वातंत्र्य.
आत्मनिर्भरता तुमचे हात दगड खाली अडकण्यापासून वाचवते. बऱ्यापैकी पैसे गाठीशी असल्यावर सततच्या आर्थिक ताण पासून सुटका होते. तुम्ही दर महिन्याच्या पगारावर अवलंबून नसला कि office politics शी सामना करणे थोडे सोप्पे जाते.
दुसरा अंक
जस जसे तुमचे वर वाढत जाते, तुमची आत्मनर्भरता तुमच्या उर्वरित जीवनाची दिशा ठरवते.
तुम्ही आतापर्यंत एक चांगलं करिअर घडवलं असेल, कैटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्या असतील, आणि आयुष्याच्या ‘दुसऱ्या अंका ‘ बद्दल विचार करायला सुरुवात केली असेल.
चाळीशीनंतर असो, रिटायरमेंटनंतर असो किंवा करिअर बदलल्यावर असो, हा असा टप्पा आहे जिथे आत्मनिर्भरता एक आधार आणि दिशादर्शक बनतं.
मिळकत आणि खर्च याच्या पलीकडे जाऊन तुमची संपत्ती बनवण्या आणि वाढविण्या वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थाने तेव्हाच आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाल जेव्हा तुमची एकूण संपत्ती तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या खर्चासाठी पुरेशी असेल. ही वर्षांची संख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते, पण मूळ कल्पना तीच आहे: तुम्ही तुमच्या रोजच्या खर्चासाठी तुमच्या पगारावर अवलंबून नाही.
आणि याचं फळ काय? स्वातंत्र्य!
तुम्हाला कदाचित कामाचा वेग कमी करायचा असेल, छंदांना वेळ द्यायचा असेल, नवीन व्यवसायात उतरायचं असेल. जेव्हा तुमच्याकडे पुरेशी आर्थिक तरतूद असेल, तेव्हा हे सगळं शक्य होतं.
आर्थिक स्वातंत्र्याचं अंतिम फळ
हो, पैसा सुख विकत घेऊ शकत नाही, पण तो मनाची शांती नक्कीच देऊ शकतो.
आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला सन्मान, सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वाचं स्वातंत्र्य देतं.
न आवडणारी नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य
एखाद्या त्रासदायक नात्यातून बाहेर पडण्याच स्वातंत्र्य
स्वप्नांचा पाठलाग करण्याच, किंवा वाटलं तर सरळ थांबण्याच स्वातंत्र्य
कारण, शेवटी पैसा फक्त चलन नाही – ती स्वयत्तता आहे.


Leave a comment